सुसज्ज दोनशे खाटांचे रुग्णालय विहीत वेळेत पुर्ण करा: खासदार इम्तियाज जलील यांचे निर्देश।
औरंगाबाद: खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकारी, अभियंते यांची योग्य सोशल डिस्टंसिंग पाळत सुभेदारी विश्राम गृह औरंगाबाद येथे महत्वपुर्ण बैठक पार पडली। या बैठकीत विकासात्मक विषयावर चर्चा करुन आज पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या सर्व विकास कामांचा आढावा घेण्यात आला।
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने होणाऱ्या विकास कामांची गती वाढवावी आणि ज्या कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाची कामे केलेली आहे अशा सर्व कंत्राटदारावर कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी अश्या सुचना खासदार इम्तियाज जलील यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या। तसेच विकास कामात हलगर्जी करणाऱ्या आणि निकृष्ठ दर्जाच्या कामांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांची अजीबात गय केली जाणार नाही असे सुध्दा खासदार जलील यांनी स्पष्ट केले।
खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहरात महिला, शिशुसाठी तयार करण्यात येणारे २०० खाटांचे रुग्णालय विहीत वेळेत पुर्ण करण्याचे निर्देश उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याना दिल्या। विषेश म्हणजे सदरील रुग्णालयासाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। उच्च न्यायालयाने सदरील प्रकरणाचे गांभीर्य पाहता त्वरीत रुग्णालयाचे काम सुरु करण्याचे आदेश संबंधितांना दिले होते. याव्यतिरिक्त केंद्रीय मार्ग निधी, नाबार्ड, अर्थसंकल्पिय कामे आणि अर्थसंकल्पिय इमारती या योजनांतर्गत येणाऱ्या रस्ते, पुल, इमारती विषयी तसेच व्दिवार्षिक देखभाल दुरुस्तीचे कामे, रस्ते, पुल परिक्षण दुरुस्ती विषयी व शासकीय निवासी आणि अनिवासी इमारती दुरुस्ती संबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली। खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहरातील आणि वैजापूर, कन्नड, गंगापूर, खुलताबाद येथील रस्त्याविषयी चर्चा करुन ज्या ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे त्याची त्वरीत दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले।
सदरील बैठकीत खासदार जलील यांनी औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या सर्व शासकीय कार्यालय, इमारतींच्या अवस्थेबाबत चर्चा करुन ज्या इमारतीमध्ये दुरुस्तीचे कामे आहेत ते लवकरात लवकर करावे आणि नविन इमारतीच्या प्रस्तावाविषयी माहिती घेतली. तसेच औरंगाबाद मध्ये असलेल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय, तालुक्यातील ट्रामा केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या नवीन, दुरुस्तीची कामे तात्काळ करण्यात यावी जेणे करुन तेथे येणाऱ्या रुग्णांची, डॉक्टरांची होणारी गैरसोय टाळता येईल तसेच सुपरस्पेशलिटी इमारतीच्या कामाचा अहवालावर योग्य त्या सुचना खासदारच्या वतीने देण्यात आल्या।
याबैठकीपुर्वी खासदार इम्तियाज जलील यांनी मिलकॉर्नर बारापुल्ला गेट येथे नव्याने तयार करण्यात येणाऱ्या पुलाची पाहणी केली होती, बैठकीमध्ये संबंधित अधिकारी, अभियंता यांना पुलाचे, गेटचे काम तात्ळीने पुर्ण करण्याचे सुचना दिल्या याव्यतिरिक्त शहरातील इतर ऐतिहासिक गेटच्या कामांचा तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश खासदार जलील यांनी दिल्या।
या बैठकीमध्ये एसजी देशपांडे अधीक्षक अभियंता, एसएस भगत कार्यकारी अभियंता, वायबी कुलकर्णी कार्यकारी अभियंता, पश्चिम विभाग, एनबी भंडे कार्यकारी अभियंता, जागतिक बँक प्रकल्प विभाग, एवाय येरेकर उपविभागीय अभियंता, दक्षिण उपविभाग, सर्व उपविभागीय अभियंता एसबी बिरारे विशेष प्रकल्प, एसजी केंद्रे खुलताबाद, पीटी सोनकांबळे कन्नड पुर्व, जेएम जाधव कन्नड पश्चिम, एचके ठाकुर गंगापूर, एनके गायकवाड गंगापूर पश्चिम, राष्ट्रीय महामार्गचे सौ.वनवे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती।